मुंबईत स्वाइन फ्लूची साथ... स्वाइन फ्लूचे अमुक बळी... अशा बातम्या पेपरमधून प्रसिद्ध होत आहेत. मुंबईकरांच्या मनात स्वाइन फ्लूची भीती आहे. हा आजार
नेमका काय आहे? आणि तो टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याबाबत सांगताहेत, हाफकिन इन्स्टिट्यूटच्या व्हायरॉलॉजी विभागाचे संचालक डॉ. अभय चौधरी
पावसाळ्याचे दिवस आले, की सर्वसाधारणपणे फ्लूचा सीझन असतो. खरंतर फ्लू हा शॉर्टफॉर्म आहे इन्फ्लुएन्झाचा. इन्फ्लुएन्झामध्ये अचानकपणे सदीर् होते, खोकला होतो किंवा ताप येतो. सर्वसाधारण फ्लूची ही लक्षणं आहेत. विशिष्ट प्रकारच्या विषाणूने होणारा आजार म्हणजे इन्फ्लुएन्झा. हा विषाणू मिक्सोव्हायरसच्या गटात मोडतो. या विषाणूचे तीन प्रकार आहेत इन्फ्लुएन्झा ए, इन्फ्लुएन्झा बी, इन्फ्लुएन्झा सी. यापैकी 'इन्फ्लुएन्झा ए'मुळे होणारा आजार अधिक गंभीर असतो. तो आजार पसरण्याची शक्यता अधिक असते.
बी प्रकारच्या व्हायरसमुळे होणाऱ्या आजाराची तीव्रता कमी असते. तो खूप गंभीर नसतो. तर सी प्रकारचा व्हायरस तर अगदी सौम्य असतो. ए प्रकारच्या विषाणूत आठ जीन्सचे गट असतात. हा माणसांमध्ये आणि इतर प्राणी आणि पक्ष्यांमध्येही आढळतो. माणसांमध्ये आढळून आल्यास तो असतो ह्युमन इन्फ्लुएन्झा. याशिवाय पक्ष्यांमधला बर्ड इन्फ्लुएन्झा, प्राण्यांमधला इन्फ्लुएन्झाही प्रसिद्ध आहे.
माणसांना फ्लू झालेला असल्यास त्याचे विषाणू श्वासावाटे, खोकल्यावाटे पसरतात. नाकातून वाहणाऱ्या पाण्यातही ते असतात. या स्त्रावाचा स्पर्श झाला तर वापरातल्या वस्तू दूषित होतात. त्यांना इतर कुणी स्पर्श केला तर किंवा त्याच्या संपर्कात येणाऱ्याला त्याचा संसर्ग होतो. स्वाइन फ्लूबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा उगम मूळचा मेक्सिकोमधला. ह्युमन फ्लू, बर्ड फ्लू आणि स्वाइन फ्लू तीन प्रकारच्या विषाणूंचे जीन्स एकत्र येऊन स्वाइन फ्लूचा विषाणू (एचवनएनवन)तयार झाला आहे.
मागच्या वषीर् पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईमध्ये फ्लूचे प्रमाण २० ते २२ टक्के होतं. त्यात सीझनल ए आणि स्वाइन फ्लू हे दोन्ही विषाणू आढळून येत होते. या वषीर्देखील हे दोन्ही प्रकारचे विषाणू आढळून येत आहेत. अर्थात दोन्ही विषाणूंमध्ये तुलना केल्यास त्यात 'एचवनएनवन'चं प्रमाण काहीसं अधिक आहे हे खरं आहे. पण मीडियातून प्रसिद्ध होणारी माहिती, लोकांमध्ये वाढलेली जाणीव यामुळे पेशंटची तपासणी केली जाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे ते लक्षात येऊन आजाराची चर्चा मोठ्या प्रमाणावर होऊ लागलीय. आजाराचं प्रमाण मात्र खूप वाढलंय असं बिलकूल म्हणता येणार नाही. फ्लूची साथ छोट्या प्रमाणावर असेल तर त्याला एपिडेमिक म्हटलं जातं. एखाद्या आजाराची साथ जगभर मोठ्या प्रमाणावर असेल तर ती स्पायंडमिक म्हणून ओळखली जाते.
उपाय
> खोकताना, शिंकताना हात दुमडून कोपराचा भाग नाकावर ठेवावा. तळहाताने आपण अनेक गोष्टींना स्पर्श करीत असल्याने त्याचा स्पर्श शक्यतो नाकाला करू नये.
> आपल्याला सर्दी, खोकल्याचा त्रास होत असेल तर चेहऱ्यावर साधे मास्क लावावे. त्यासाठी साधा रुमालही चालू शकेल. मात्र तो रुमाल वेगळा ठेवा.
> साधारणत: २० फुटांपर्यंतच्या परिसरात याचे विषाणू पसरु शकतात. त्यामुळे सदीर्-खोकल्याची लक्षणं असलेल्यांनी मास्क वापरावा. मास्कमुळे तो पसरण्यास अटकाव होईल.
> मास्क ओला झाला तर त्याची परिणामकारकता कमी होते. त्यामुळे पाच-सहा तासांनी तो बदलता आल्यास बदलावा. वापरलेला मास्क इकडे तिकडे न टाकता तो गुंडाळून ठेवून द्यावा.
> वापरलेला मास्क गरम पाण्यात किंवा डिटर्जंट पाण्यात घालून धुऊन वापरावा. तो इतर कपड्यांमध्ये न टाकता वेगळा धुवावा.
> ताप असलेल्या व्यक्तींनी इतरांशी संपर्क टाळावा. डोळ्यांना नाकाला हात लावू नये. आपले हात इतर गोष्टींना लावू नये.
> दिवसातून पाच-सहा वेळा तरी साबण लावून हात धुवावेत. हँडडिसइन्फेक्टंट बाजारात सहज मिळतात. त्याचाही वापर करता येईल.
> मुख्य म्हणजे ताप, सदीर्-खोकल्याचा आजार अंगावर काढू नये. त्रास जाणवत असेल तर डॉक्टरकडे जाऊन तातडीने तपासणी करून घ्यावी. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधोपचार सुरू करावेत.
> सीझनल इन्फ्लुएन्झाची लस पूवीर्पासून उपलब्ध आहे. आजाराचा धोका असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती देता येईल.
लक्षणं
> स्वाइन फ्लूची लक्षणं ही इतर कोणत्याही फ्लूसारखीच असतात.
> अचानक ताप येतो, सदीर् होते, खोकला येऊ लागतो.
> घसा खवखवतो, धाप लागते किंवा काही वेळा उलट्या होतात.
> संपूर्ण अंग दुखू लागतं.
> अनेक पेशंटना डोकेदुखी, पाठदुखीचा त्रास होतो.
> लहान मुलं खाणं-पिणं बंद करतात.
घाबरण्याचं कारण नाही
सीझनल फ्लूची लक्षणं वर्षभर थोड्या-फार प्रमाणात आढळून येत असतात. या विषाणूचं अस्तित्व वर्षभर जाणवतं. परंतु त्याचं प्रमाण वाढतं ते पावसाळ्याच्या दरम्यान. स्वाइन फ्लूला घाबरण्याचं अजिबात कारण नाही. कोणत्याही सर्वसाधारण फ्लूसारखाच तो असतो. आतापर्यंतच्या संशोधनात स्वाइन फ्लूच्या विषाणूची तीव्रता फारशी असल्याचं आढळून आलेलं नाही. या विषाणूतही फार मोठा बदल झालेला नाही. हा आजार सहज नियंत्रणात येऊ शकतो. लोकांमध्ये केवळ त्याची जाणीव अधिक झाल्याने त्याची चर्चा होतेय. |